Thursday, 27 October 2011
USHA: श्री आज प...
USHA: श्री आज प...: श्री आज पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक!आजच्या दिवसाला बलिप्रतिपदा असेही म्हणतात.राक्षसांचा राज...
श्री
आज पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक!आजच्या दिवसाला बलिप्रतिपदा असेही म्हणतात.राक्षसांचा राजा बली हा मोठा भगवतभक्त होता त्याने केलेल्या यज्ञाच्या समाप्तीला साक्षात भगवान विष्णू छोट्या बटूच्या रुपात दक्षिणा मागायला आले,राजानी त्यांना नमस्कार करून काय हवी ती दक्षिणा मागायला सांगितली,वामन अवतारात आलेल्या विष्णूला ओळखायला दैत्यगुरू शुक्राचार्यांना अजिबात वेळ लागला नाही त्यांनी बलीराजाला सावध केले पण राजा शब्दाचा पक्का होता,त्याने माघार घ्यायला नकार दिला,साक्षात विष्णू भिक्षा मागायला आल्यावर ती न देण्याचा करंटेपणा करणं बळीराजासारख्या दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजाला शक्यच नव्हतं.तीन पाऊल जमीन दक्षिणा बटूने मागितली.वामनाने एका पावलाने पृथ्वी,दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापला,तिसरे पाऊल कुठे ठेवू विचारल्यावर बळीराजाने विनम्रपणे नमस्कार करून आपले मस्तक पुढे केले,त्यावर पाऊल ठेऊन वामनाने त्याला थेट पाताळात ढकलले,त्याच्या दानशूर पणावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला वर मागायला सांगितला तर बळीराजा म्हणाला की माझ्या दारावर तुम्ही सतत उभे रहा.भगवान विष्णू आता वैकुंठ सोडून बळीराजाच्या दरवाजावर पहारेकरी म्हणून उभे झाले.वैकुंठात लक्ष्मीदेवी अत्यंत दुखी झाली पण ती लगेचच निघाली जिथे नारायण तिथे लक्ष्मी !दारी चालून आलेल्या लक्ष्मीचे बळीने मनोभावे स्वागत केले तिला बहिणीचा मान देऊ केला.हीच संधी साधून लक्ष्मीने आपले पती म्हणजे नारायण जे दारावर उभे होते त्यांच्या सुटकेची विनवणी केली,उदार बळीराजाने मोठ्या मनाने वामनाची सुटका केली.लक्ष्मी नारायण प्रसन्न झाले आणी त्यांनी बळीला आशीर्वाद दिला.जगाचे पालन पोषण करणाऱ्या लक्ष्मी नारायणाला निव्वळ भक्तीने आपल्या अंकित करून घेणाऱ्या बळीराजाचे स्मृती प्रीत्यर्थ आज बली प्रतिपदा! पाडवा!लक्ष्मी नारायण आपल्या सगळ्यांना प्रसन्न व्हावे हीच शुभेच्छा !लक्ष दिव्यांच्या ज्योतीने आपल्या आयुष्यात सुख सौभाग्याचा आरोग्याचा प्रकाश पसरावा ही शुभेच्छा व्यक्त करून मी आज इथेच थांबते.
सौ.उषा.
Subscribe to:
Posts (Atom)