Tuesday, 1 November 2011

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री 4 रघुनाथचे बोलणे ऐकून...
                                                                         श्री                                    4
रघुनाथचे बोलणे ऐकून महाराजांना नवल वाटले हा माणूस आहे तरी कसा? बर ह्याला आज मुहूर्ताचा दिवस आहे हे कुणी सांगितलं !महाराज काही उत्तर देणार इतक्यात त्यांची लाडकी नात सुवर्णरेखा धावतच त्यांच्या जवळ आली.तिचा घामेघूम झालेला चेहेरा महाराजांनी दोन्ही हातात धरून प्रेमाने कुरवाळला अन अलगद पुसून काढला.एव्हाना राजकन्या त्यांच्या मांडीवर चढून बसली होती.तिने समोर उभ्या असलेल्या दोन नवीन माणसांना बघितलं आणी ती जोरात ओरडली किती घाणेरडी,कळकट माणसे आहेत ही.आधी ह्यांना बाहेर घालवा.ह्या मळके कपडे घातलेल्या माणसांकडे मला अजिबात बघायचे नाही.महाराज सुदर्शन तिला समजावण्याच्या स्वरात म्हणाले हे छान चित्र काढतात त्यांना मुद्दाम आपल्या राजमहालाच्या रंगकामात मदत करण्याकरता बोलावले आहे.सुवर्णरेखा पुरेश्या अविश्वासाने त्यांच्याकडे बघून म्हणाली महाराज मला नाही वाटत ह्यांना चित्र बित्र काढता येईल.रघुनाथ हलक्या आवाजात म्हणाला राजकन्येनी आम्हाला एक संधी देऊन बघावी नाहीच आवडले तर आम्ही परत जाऊ.महाराजांना पण हायसे वाटले.गणपतीच्या चित्राने सुरुवात करावी यावर सगळ्यांचेच एकमत झाले.रघुनाथला देवाची खोली दाखविण्याकरता एक सेवक पुढे झाला.महाराजांना नमस्कार करून रघुनाथ आणी सगळे समान उचलून राजेश्वरी त्याच्या पाठोपाठ निघाली.महाराज थोडे अस्वस्थ झाले पण आता त्यांनी थोड्यावेळ चूप बसून काय होते ते बघण्याचा निर्णय घेतला.प्रशस्त देवघर त्यात देवांच्या असंख्य मूर्ती !राजेश्वरी स्वतःशीच हसली.राजपुरोहितानी ब्राम्हणांच्या मदतीने देव्हारा सकाळीच खोलीच्या मध्ये ओढून ठेवला होता ,नेहेमीच मुहूर्त देवघरापासून होत आला होता त्यामुळे सगळी जय्यत तयारी होती.रघुनाथच्या अंगात एकदम शक्ती संचार झाल्याप्रमाणे त्याने सामानाची मांडणी करून एकदा सगळे सामान बरोबर आहे की नाही ते बघितले,खुशीत हसून त्याने देवघरामागची भिंत खरवडून काढली.सगळी भिंत एकसारखी करण्यात त्याला राजेश्वरीने हातभार लावला.सर्व सेवकांना रघुनाथने बाहेर जायला सांगितले,राजेश्वरीने बरोबर आणलेला पडदा दाराला लावून बंदिस्त केले,ही रघुनाथची नेहेमीचीच पद्धत होती.चित्र पूर्ण झाल्याशिवाय तो कुणालाही ते बघू देत नसे.सगळ्या वाड्यात एक विचित्र कुतूहल दाटून राह्यले होते.महाराजांनी सक्त ताकीद दिली होती की कितीही उशीर झाला तरी चित्र पूर्ण झाल्यावर आम्हाला ते दाखविण्यात यावे.रात्री अकरा वाजता महाराजांना चित्र पूर्ण झाल्याचा निरोप मिळाला.महाराज जागेच होते,ते लगेचच निघाले,महाराणी सुलक्षणा पेंगुळलेल्या राजकन्येला सावरत लगबगीने निघाल्या.देवघर मोठ मोठ्या समयांच्या उजेडाने भरून गेले होते.एका बाजूला रघुनाथ आणि राजेश्वरी उभे होते.महाराज देवघराच्या दारात आले अन त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.साक्षात कैलासच अवतरला आहे की काय!बर्फाचा पहाड त्यावर शंकर पार्वती अन त्यांच्या मांडीवर गजानन !वा अति सुंदर अप्रतिम!महाराजांचे कुलदैवत शंकर पार्वती पण अनायासेच साकार झाले होते.महाराज गहिवरून म्हणाले रघुनाथ,महाराज वीरसिंगानी तुमची थोडी कमीच तारीफ केली असं आता आम्हाला वाटतंय.आता आम्ही तुमचं काही ऐकणार नाही तुम्हाला आमच्या वाड्यावरच राहावे लागेल आणी हो तुमच्या राजेश्वरीला आम्ही राहण्याची परवानगी देतो आहोत.
                                     सौ.उषा.