Saturday, 29 October 2011

                                                श्री                                                    1
दिवाळीची गडबड संपली अन वातावरणात एक प्रकारचा शिथिलपणा आला
  उरलेला फराळ अन फटाके संपविले जातील म्हणा.आपण सगळ्यांनीच खूप आनंद घेतला दिवाळीच्या दिवसांचा हा आनंद पुढे वृद्धिंगत करण्याकरता मी आजपासून तुमच्या करता एक नवीन आनंद घेऊन आले आहे.आपणा सगळ्यांना लहानपणापासून ऐकायला आवडते ती गोष्ट खूप दिवस पुरेल अशी  कथा मी आजपासून तुम्हाला सांगायला सुरुवात करणार आहे.कथा अर्थातच काल्पनिक आहे.असं म्हणतात की सत्याला मर्यादा असतात पण कल्पनेला कुठलेच बंधन नसल्याने ती अमर्याद धावू शकते.आणी निखळ मनोरंजन हाच हेतू असला तर मग थांबायचं कश्याला ?
                                               ही कथा आहे १९४७ च्या थोड्या आधी घडलेली.सुदूर एका खोल दरीत महाराज सुदर्शन आणी देवी सुलक्षणा यांचे सुंदरपूर नावाचे राज्य होते.त्यांचे सुपुत्र सुजय उच्च शिक्षण घेण्याकरता लंडनला गेले होते.त्या वेळच्या प्रथेप्रमाणे युवराज सुजयचा विवाह लहानपणीच दिवापुरचे महाराज भरतसिंग यांची लाडकी मुलगी सुकन्याशी झाला होता.सुकन्या अत्यंत रूपवान होती पण ?जाऊ दे राजवाड्यात सुद्धा या विषयी कोणी फारसं बोलत नसे.सुजय आणी सुकन्या यांची कन्या राजकुमारी सुवर्णरेखा पण आपल्या आई प्रमाणेच अत्यंत रूपवती होती.अवघ्या आठ वर्षाची सुवर्णरेखा आक्रस्ताळेपणा करून सगळा राजवाडा हलवून सोडायची .लहान असल्यामुळे सगळेच सहन करायचे.                                                                                             भारताला स्वतंत्र करण्याकरता देशाच्या कानाकोपऱ्यात जोरदार हालचाली सुरु होत्या,अर्थात सुंदरपूर सारख्या अडनिड ठिकाणी या विषयी फारशी माहिती नसणं स्वाभाविकच होतं त्यांना वेगळ्याच गोष्टीची उत्सुकता होती ती म्हणजे राजे सुजय केव्हा परत येणार !राजे येणार असल्याची कुजबुज सगळ्या सुंदरपुरात एव्हाना पसरली होती आणी त्याला कारण होतं राजवाड्याच्या रंगकामात रघुनाथ नावाच्या एका परगावच्या चित्रकाराची घेतलेली मदत!
                           रघुनाथ विषयी कोणालाच काही माहित नव्हतं.महाराज सुदर्शन यांचे मित्राने त्याचे नाव सुचविले होते.
                                                             सौ.उषा.              
      

No comments:

Post a Comment