Friday, 30 September 2011
USHA: ...
USHA: ...: श्री नवरात्रात पुष्कळ लोक सप्तशती वाचतात.त्यात सुरवातीलाच कवच,अर्गला, कीलक, प...
श्री
नवरात्रात पुष्कळ लोक सप्तशती वाचतात.त्यात सुरवातीलाच कवच,अर्गला, कीलक, पाठ म्हणावा लागतो.कवच तर नावाप्रमाणे देवीचे कवच आहे.ज्याच्या नित्य पठणाने सर्व संकटातून आपली मुक्ती होईल असे आश्वासन त्यात आहे.त्यानंतर अर्गला म्हणजे कडी ,सप्तशतीच्या पठणाने अंगात दैवी सामर्थ्य संचारते,ह्या दैवी शक्तीचा कलियुगातल्या माणसांनी दुरुपयोग करू नये म्हणून ह्या श्लोकांना अर्गला म्हणजे कडी आणी कीलक म्हणजे कुलूप लावून बंदिस्त केले आहे.देवीच्या भक्तांना ह्याचा काहीच त्रास होत नाही.देवीची कृपा एवढीच त्यांची अपेक्षा असते,पण काही लोक एवढ्याने संतुष्ट होणारे नसतात त्यांना सिद्धी आणी प्रसिद्धी पण हव्या असतात .ह्यातले काही विशिष्ट श्लोक म्हणून हे कडी कुलूप उघडले जाते .अर्थात देवीच्या भक्तांना सप्तशती पाठाचे पूर्ण फळ मिळते.मग कशाला उगीच कडी कुलूप उघडून बघायचे?आपण नुसतीच प्रार्थना करू " रूपं देही जयं देही यशो देही द्विषो जहि " जगदंबेच्या चरणी हे पुष्प ! सौ.उषा.
Thursday, 29 September 2011
श्री
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते .सर्व देवतांच तेज एकवटल आणी त्या तेजाने सर्व विश्व व्यापून टाकलं.देवीच्या अनुपम सौंदर्यावर मोहित होऊन तिच्याशी विवाह करण्याच्या इराद्याने आलेले दोन मदमत्त राक्षस आपसात लढून मेले. चंड मुंड शुंभ निशुंभ रक्तबीज महिषासुर अश्या सर्वच राक्षसांचा देवीने पूर्ण नायनाट केला.सगळ आसमंत देवीच्या जयजयकाराने भरून गेले.सर्वाना भयमुक्त करणारी देवी दुर्गा !पृथ्वीला निरनिराळ्या पोषक हरित तृणानी,शाक भाज्यांनी भरून टाकणारी शाकंभरी !सर्वाना सदैव हवीहवीशी वाटणारी ,हिरण्य वर्णा, हिरण्मयी, महालक्ष्मी तिच्या पूजनाशिवाय आमचे नवरात्र अपूर्णच म्हणावे लागेल.त्या जगन्मातेच्या चरणी हे दुसरे पुष्प. . . सौ.उषा.
Wednesday, 28 September 2011
श्री
दुर्गा काली जया रमा हरिप्रिया अंबे जगन्मंगले गौरी श्री भुवनेश्वरी तुज प्रती लक्षावधी वंदने .आज पासून देवीच नवरात्र सुरू झालं.सगळ्या वातावरणात एक प्रकारच चैतन्य भरलंय.घरोघरी घटस्थापना ,अखंड दिवा, माळ, नैवेद्य ,उपवास ,सप्तशती पारायण ,नवचंडी यज्ञ ,असं काय अन किती करू असं झालय.मला स्वतःला देवीच अष्टभुजा स्वरूप फार आवडतं.बलशाली महिषासुरावर चालून जाणारी ,आठही हातात शस्त्र धारण करणारी, सिव्ह्वाहीनी देवी सर्व स्त्री जातीला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देते.ती अबला नाही.ती शक्ती आहे अन तरीही ती रमा हरिप्रिया आहे.सर्वांच मंगल करणारी आहे.जगत्जननी आहे.वरदायिनी आहे,भक्तांना संजीवनी स्वरूप आहे म्हणूनच प्रियदर्शिनी आहे.त्या जगदंबेच्या चरणी नवरात्रातल पहिलं पुष्प.
सौ.उषा.
Tuesday, 27 September 2011
श्री
आम्हां भारतीय माणसांना मोक्ष मुक्ती ह्या शब्दांचे किती आकर्षण आहे हे फक्त भारतीय माणूसच समजू शकेल.हा मोक्ष किंवा ही मुक्ती मिळावी म्हणून आम्ही आजन्म काही न काही प्रयत्न करत असतो.देवभोळी माणसं वेगवेगळ्या देवांची व्रतं करतात आणी स्वतास नास्तिक म्हणवून घेणारे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना हर तऱ्हेची मदत करण्याचा पर्याय निवडतात.ह्या मोक्ष शब्दाने आम्हाला इतकी भुरळ घातली आहे की आम्ही आपल्या दिवंगत आप्तेष्टाना मृत्यू नंतर उत्तम गती मिळावी म्हणून त्यांच्या तिथीला नेमाने श्राद्ध करतो.ज्यांना तिथी माहीत नाही ,लक्षात नाही त्यांनी आजच्या दिवशी म्हणजे पितृमोक्ष अमावास्येच्या दिवशी श्राद्ध करावे.ह्या निमित्ताने आपल्या पूर्वजांचे त्यांच्या उत्तम कार्याचे स्मरण होत असेल तर हे खूपच छान आहे.पण जिवंत आप्तेष्टांशी चांगले वागावे किबहुना सगळ्यांशी चांगले वागावे हे कसे आपल्या हातात आहे.आपले सत्कर्मच आपल्याला मोक्ष मिळवून देईल असे मला वाटते.
सौ.उषा
Monday, 26 September 2011
सुधारणा करायची म्हंटल म्हणजे आपल्याला दुसऱ्या माणसांनी काय काय सुधारणा करायला हव्या ते पटकन आठवतं.आपण सुचवलेल्या सुधारणा त्यांना कितपत मान्य आहेत ह्याच्याशी आपल्याला काहीही देणघेण नसतं.पण खर सांगू दुसऱ्याला सुधारण्याच्या फंदात आपण न पडलेलं बर.स्वताला सुधारणे , स्वतः मध्ये अनुकूल बदल घडवून आणणे हे कितीतरी पटींनी सोपे आणी जास्त फायदेशीर आहे.आपल्यातले चांगले बदल आपल्या व्यक्तीमत्वाला एक वेगळीच उंची प्राप्त करून देतात .हे बदल कायमस्वरूपी आनंददायक ,इतरांना प्रेरणा देणारे ठरतात पण आपण आपला बहुमोल वेळ इतरांना सुधारण्याच्या फोल प्रयत्नात घालवतो.देवानी दिलेलं आयुष्य सत्कारणी लावणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.ह्या आयुष्याचा जास्तीत जास्त भाग सगळ्यांच्या उपयोगी कसा पडेल हे ठरवणे आपल्याच हातात आहे.परमेश्वरानी आपल्या सगळ्यांनाच ही बुद्धी दिलेली आहे. . . . . . . .. . . . सौ.उषा .
Sunday, 25 September 2011
श्री जिवलगा कधी रे येशील तू ? एक सुंदर गाणं.हा जिवलग आपला प्रत्येक वयात वेगळा असतो.अगदी तान्हेपणी आपली आई आपल्याला जिवलग असते.तुम्ही म्हणाल आम्हाला आमची आई अजूनही आवडते.बरोबर आहे अहो मला सुद्धा माझी आई खूप आवडते.माझा मुद्दा समजून घ्या.तरुण वयात आपल्या जोडीदाराशिवाय जगात काहीही चांगले असूच शकत नाही असा आपल्याला विश्वास असतो.आणी संध्या छाया दाटून आल्या की मग मात्र सगळेच धूसर होत जाते.कुणाच्याही हातांचा आधार पुरेसा वाटत नाही.त्यावेळी कळते की सर्व माणसांचा खरा जिवलग कुणी दुसराच आहे.जीवनाच्या धावपळीत या खऱ्या जिवलगाला आपण पार विसरून गेलो होतो त्याची आतातरी आठवण करू या.गोविंद बोलो बोलो गोपाल बोलो राधा रमण हरी गोपाल बोलो. सौ.उषा .
Saturday, 24 September 2011
श्री आज एक सुंदर प्रवचन ऐकायला मिळालं.देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या हा ज्ञानेश्वर माउलीचा हरी पाठातला पहिलाच अभंग .आता आपल्याला काय वाटतं की देवाचे दार म्हणजे देऊळाचे दार पण याचा अर्थ तसा नाईये म्हणे.देवाच दार म्हणजे त्याच नामस्मरण .त्याच नाम घेऊन आपण हळू हळू आपली योग्यता वाढवीत न्यायची इतकी की साक्षात चतुर्भुज नारायण आपल्या समोर उभा राहिला पाहिजे. आणी मग चारी मुक्ती आपल्या समोर हात जोडून उभ्या राहतील असं पुढे माउली आपल्याला आश्वासन देते आहे.आज इतकच. सौ.उषा.
Friday, 23 September 2011
श्री aa एकदा का कळलं की आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतोय की माणसाला खूप हुरूप येतो.मग कितीही काम पडलं तरी कंटाळा येत नाही.सध्या भागवत ऐकायला मिळतंय आणी सत्संग.आनंदाचे डोही आनंद तरंग.भागवत म्हणजे भक्तांच्या कथा भक्तीच्या कथा आणी मुख्य म्हणजे कृष्ण कथा .कुठल्याही वयाच्या माणसाला आवडेल असं रसाळ अमृत जे कानाच्या वाटे थेट हृदयात उतरते.सगळ्या इंद्रियांना कानांचा हेवा वाटतो आणी कान तरी एकटे कुठे संभाळणार ते बिचारे पटकन हृदयाच्या स्वाधीन करतात आणी मग हृदय रक्तात मिसळून सगळ्या शरीरात हे अमृत पोचवण्याच काम करतं तेव्हा कुठे शांती मिळते.हा आनंद वाटायचाच असतो म्हणून मी हे तुमच्या पर्यंत पोचवण्याच काम केलं.राधारमण गोपालकृष्ण आपणा सर्वाना आनंद आणी निर्मळ शांती देवो ही त्याच्या जवळ प्रार्थना . सौ.उषा.
Tuesday, 20 September 2011
श्री रोजच काहीतरी लिहायचे म्हणजे काही गम्मत नाही.विषय कुठून आणणार पण आता एकदा ठरवलं आहे तर माघार घेणे शक्य नाही.समर्थ म्हणतात न दिसामाजी काहीतरी लिहीत जावे मग ते काहीही असेना का शिवाय माझ्या शिवाय वाचणार तरी कोण मग कसला आलाय संकोच स्वतःच स्वताशी बोलायचं मनात खोलवर दडून बसलेया कितीतरी गोष्टी आपोआपच बाहेर येतील आणी मन होईल निर्मळ ताजं.अस निर्मळ मन असत फक्त लहान मुलांच.देवाजवळ जाण्याकरता असच सुमन हवं न जे देवाला अर्पण करायला जराही संकोच वाटणार नाही. सौ.उषा
Monday, 19 September 2011
श्री पहाटे न उठणाऱ्या किंवा न उठू शकणाऱ्या माणसांची मला नेहेमीच खूप दया येते.आयुष्यातल्या किती मोठ्या आनंदाला ते मुकतात हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल या कल्पनेनी मलाच खूप वाईट वाटत.लालबुंद सूर्याचा गोळा हळू हळू वर येताना बघण्यात जे काय थ्रिल आहे ते स्वतःच अनुभवलेलं बरं.चिऊ चा चिवचिवाट ऐकण्या करता,थंडगार वाऱ्याची झुळूक अनुभवण्या करता आणी तब्बेत चांगली ठेवण्याकरता तरी पहाटे उठा.या पहाटेशी माझं नात फार जुनं आहे अगदी माझ्या जन्मापासून.पहाटे जन्म म्हणून तर उषा नाव ठेवलं न माझं .आजीचं गोड गाणं,गायींच्या गळ्यातल्या घुंगरांचे आवाज, काढल्या जाणाऱ्या दुधाच्या धारेचा आवाज ,ते दुधाचं फेसाळलेल पातेलं,त्याचा तो सुगंध सगळ कसं अगदी आनंद आनंद देणारं. सौ.उषा
Sunday, 18 September 2011
श्री आपल्याला कोण व्हायचे प्रेक्षक की प्रेक्षणीय हे आपण जेवढ्या लवकर ठरवू तेवढे ते आपल्या हिताचे ठरते.लाखो डोळे ज्याच्यावर खिळले आहेत तो सचिन व्हायचे की लाखो प्रेक्षकांपैकी एक ज्याला काहीही विशेष ओळख नाही असा अती सर्व सामान्य माणूस कोण होणार आपण ? अर्थात सचिनची मैदानावरील एखादी बहारदार खेळी बघण्यात निश्चितच एक वेगळाच आनंद आहे.प्रेक्षक म्हणून कधीतरी हा आनंद आपण नक्कीच घेतला पाहिजे पण कायमच का आपण प्रेक्षकाची भूमिका बजावणार ह्याचा मात्र गांभीर्याने विचार करायला हवा.प्रेक्षक असताना पण आपल्यातला विध्यार्थी जागा असला पाहिजे तरच आपण आयुष्यात कधीतरी काहीतरी करून दाखवू शकतो अस मला वाटत . सौ. उषा
Saturday, 17 September 2011
श्री रोज काहीतरी लिहावे म्हणजे भाषा सुधारते आत्मविश्वास वाढतो. स्वताच स्वतःजवळ मन मोकळे केल्यामुळे मनाला एक प्रकारचा तजेला येतो.कुणीही हा प्रयोग करून पाहू शकतो.आपणच आपल्या हातून घडलेले चांगले कमीतकमी शब्दात व वाईट जास्तच जास्त शब्दात लिहून काढावे व आपण स्वतः व आपल्या जवळच्या माणसांना ते वाचून त्यावर टिप्पणी करायला सांगितले असता आपल्या व्यक्तीमत्वात विलक्षण सुधार झाल्याचे आपल्या व इतरांच्याही लक्षात आल्या वाचून रहात नाही...... सौ. उषा
Friday, 16 September 2011
श्री हिशोब आपण सगळेच कमी अधिक फरकात करत असतो .कधी पैशांचा कधी आणखी कसला पण हिशोब म्हंटल की आपल्याला पैशांची बेरीज वजाबाकी पटकन आठवते.हो दुसऱ्यांनी केलेल्या चुका, आपल्यावर इतरांनी केलेले अन्याय आपल्याला अगदी झोपेतून उठविले तरी बिनचूक आठवतात .हा हिशोब कसा अगदी काना मात्र फरक न होता आपण कधीही आठवू शकतो. आपल्याला आठवत नाही फक्त आपल्या चुका आपण दुखवलेली मन .या सगळ्यांचा हिशोब आपण ठेवायला शिकू तेव्हाच माणूस म्हणून एक पाऊल पुढे पडले असे म्हणता येईल.तेव्हाच आपण सुसंकृत होण्याच्या वाटेवर चालायला लागलो असे समाधान आपण मानू शकतो .
सौ.उषा
Thursday, 15 September 2011
श्री न दिसणारे हात
कितीही ठरवले तरी काही माणसांवर आपण कायम राग धरू शकत नाही.ही ती माणसं असतात ज्यांनी कळत नकळत आपल्याला खूप मदत केलेली असते.त्याचं स्वरूप काहीही असू शकत आर्थिक शारीरिक मानसिक त्यांच आपल्या आयुष्यात काय स्थान आहे हे आपल्याला नेमक सांगता येणारही नाही कदाचित पण याच हातानी आपल्याला कठीण प्रसंगात सावरल हे आपल्या अंतर मनात नोंदल गेलं असत .आपण आपल्याही नकळत त्यांना झुकत माप देत असतो.आपल्या भोवती असणाऱ्या इतर माणसाना त्याची कल्पना नसल्या कारणाने त्यांच्याशी कित्येक वेळा आपला वाद-विवाद पण होतो.तरीही या न दिसणाऱ्या हातांबद्दल आपल्या मनात कायम कृतज्ञ भाव असू ध्या.तो न दिसणारा परमेश्वर ह्याची नक्कीच नोंद घेईल . सौ.उषा
Wednesday, 14 September 2011
श्री {शुभारंभ } आज सर्वप्रथम मी माझ्या वाचकांचे मनापासून स्वागत करते. मी काही कोणी मोठी लेखिका नाही पण काहीतरी लिहीत जावे ही सवय मात्र फार लहान असतानाच जडली आहे.हिंदी माध्यमातून सर्व शिक्षण झाल्यामुळे माझ्या मराठीत तुम्हाला असंख्य चुका आढळून येतील पण तुम्हा सर्वांच्या सहकार्याने मी लवकरच शुद्ध मराठी लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच करीन . सौ. उषा
Subscribe to:
Posts (Atom)